नारायणगाव परिसरात दीपस्तंभाप्रमाणे कार्यरत असलेल्या ग्रामोन्नती मंडळ या शिक्षण संस्थेने अमृत महोत्सवी वर्षात पर्दापण केले आहे ही आपणा सर्वांना आनंदाची व अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे. १९४४ साली गुरुवर्य रा. प. सबनीस यांनी नारायणगावच्या राणूबाईच्या माळावर जे रोपटे लावले तयाचा वेलू आज गगनावरी गेलेला आहे. आतापर्यंतच्या संस्थेच्या वाटचालीमध्ये समाजधुरीण, हितचिंतक, पदाधिकारी, ग्रामोन्नती मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे संचालक, सदस्य, शिक्षण, शिक्षकेतर कर्मचारी व देणगीदार या सर्वांनी योगदान दिलेले आहे. ग्रामोन्नती मंडळाच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रगतीमध्ये अनेकांचा हातभार लागलेला आहे.
१९९५-९६ साली संस्थेचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी स्मरणिका प्रकाशित करण्यात आली होती व तीमध्ये स्थापनेपासूनच्या ५० वर्षाच्या वाटचालीचा विस्तृत आढावा घेण्यात आला होता. आज मी संस्थेच्या या ७५ व्या वार्षिक अहवालामध्ये सुवर्णमहोत्सवानंतर आजपर्यंतच्या २५ वर्षांचा संक्षिप्त आढावा घेत आहे. कालानुक्रमे ग्रामोन्नती मंडळाने सुरू केलेले विविध शैक्षणिक विभाग व सुविधा –
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
बी. ए., बी. कॉम., बी. एस. सी. या वर्गांची सुरुवात प्रथम केली. त्यानंतर पदव्युत्तर वर्ग व बीबीए, बीसीए वर्ग सुरु केले. आज एम.ए. (इंग्रजी, हिंदी, अर्थशास्त्र, इतिहास), एम. कॉम., एम. एस.सी., एम.फिल. (इतिहास व वाणिज्य), पीएच. डी. (वाणिज्य) हे कोर्सेस आहेत.. सन २००९ मध्ये एन. सी. सी. सुरु करण्यास मान्यता मिळाली. सन २०१४ मध्ये NAAC (Bangalore) कडून ‘अ’ दर्जा मिळाला आहे.
श्रीमान महादेव विठोबा तथा तात्यासाहेब भुजबळ कृषी शिक्षण संकुल
महात्मा फुले कृषी विद्यापीठ मान्यतेने कृषी पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आला. सन २०१२ पासून हा अभ्यासक्रम कृषी तंत्र निकेतन (अॅग्री पॉलिटेक्निक) ३ वर्षे सेमी इंग्रजी माध्यम या स्वरूपात रूपांतरित झाला. महाराष्ट्र पशु व मत्स्यविज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत पशुधन व्यवस्थापन व दुग्धउत्पादन पदविका हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. ग्रामीण विद्यार्थ्यांना बहिस्थ पध्दतीने कृषी पदवी आणि उद्यानविद्या पदवी प्राप्त करण्याची संधी मिळावी म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुक्त कृषी शिक्षण केंद्र सुरू केले. वरील सर्व विभाग ‘अ’ दर्जा मान्यताप्राप्त आहेत.
जलतरण तलाव
सुमारे सहा लक्ष तीस हजार लिटर पाणी क्षमता असलेल्या सुसज्ज जलतरण तलाव, शालेय विद्यार्थ्यांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाते, तसेच जिल्हास्तरीय व व आंतर महाविद्यालयीन स्पर्धा आयोजित केल्या जातात
माध्यमिक विद्यालय, गुंजाळवाडी
आठवी ते दहावीपर्यंत वर्ग इयत्ता दहावीचा निकाल दर वर्षी १००% लागत आला आहे
आण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र
औद्योगिक क्षेत्रात झालेले बदल, संगणकीकरणाच्या प्रणालीमुळे सन २००३ मध्ये डी.टी.ई. बोर्ड, मुंबई मान्यताप्राप्त सी.एन.सी ऑपरेटर व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू केला. विद्यार्थी प्रशिक्षणासाठी सी.एन.सी. लेथ मशीन व व मिलिंग मशीन उपलब्ध केली. सन २००४ मध्ये डी. जी. ई. टी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त डिझेल इंजिन मेकॅनिक अभ्यासक्रम सुरू केला. संस्थेतून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केले प्रशिक्षणार्थी टाटा मोटर्स, फोक्सवॅगन, महेंद्रा यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये काम करत आहेत, तसेच काही विद्यार्थी स्वतःचे उद्योग, वर्कशॉप चालवतात. प्रशिक्षणाबरोबरच जोब वर्क करून विद्यार्थ्यांना अनुभव मिळत आहे. डायरेक्टर ऑफ व्होकेशनल एज्युकेशन यांनी ‘अ’ दर्जा दिलेला आहे.
कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय (ABM)
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, अंतर्गत कृषी व्यवसाय व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रम सुरू केला. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी स्वतःची शेती, शेतीपुरक व्यवसाय, बँकिंग व मार्केटिंग क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून अर्थाजर्न करीत आहेत. सन २०१६-१७ साली विद्यापीठाने केलेल्या मूल्यांकनामध्ये महाविद्यालयास ‘ब’ दर्जा मिळाला
शिक्षणशास्त्र महाविद्यालय (B.Ed.)
एन.सी.टी.ई. भोपाळ व पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने सुरू केले आहे.
कृषी विज्ञान केंद्र
We and Our Neighbour या गुरुवर्य रा. प. सबनीसांच्या विचारांनी प्रेरित होऊन उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना आर्थिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेमार्फत सन २०१० मध्ये कृषी विज्ञान केंद्राची स्थापना करण्यात आली. केंद्राचा मुख्य उद्देश हा शाश्वत शेती करण्याकरीता देशातील विविध संशोधन संस्था, कृषी विद्यापीठ यांनी संशोधित केलेले तंत्रज्ञान व पिकांचे नवीन वाण शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविणे. युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देणे. कृषी विस्तार कार्यकर्त्यांना ज्ञानसमृद्ध करण्यासाठी प्रशिक्षणे तसेच जिल्ह्यातील व बाहेर राज्यातील शेतकऱ्यांना उत्पादन व उत्पादकतेत वाढ करण्यासाठी प्रशिक्षित करणे. शेतकऱ्यांना विविध पिक प्रात्यक्षिके आयोजित करून दाखविणे. शेतकरी अभ्यास दोऱ्यांचे आयोजन करणे. कृषी प्रदर्शने, कृषी मेळावे, शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन करणे. तसेच विविध निविष्ठांचे उत्पादन करून शेतकऱ्यांना त्याचा पुरवठा करण्याचे काम हे केंद्र करत आहे. कृषी विस्ता रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ‘द मिडिया रुट्स’ या संस्थेमार्फत राज्यस्तरीय पुरस्कार देऊन कृषी विज्ञान केंद्रास गौरविण्यात आले. तसेच केंद्रातील शास्त्रज्ञांना वेगळ्या स्तरावर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आज या केंद्रामार्फत आत्मा, कृषी विभाग, नाबार्ड, मॅनेज-हैद्राबाद , यशदा-पुणे अशा विविध संस्थांच्या माध्यमातून शेतकरी भिमुख प्रकल्प राबवून गुरुवर्य रा. प. सबनीसांचे स्वप्न साकारण्याचा प्रयत्न करीत आहे.
कृषी विज्ञान केंद्राचा गौरव करताना भारत सरकारच्या निती आयोगाने ‘अ’ दर्जा दिला आहे.
सन १९९६ कृषि विद्यालय इमारत बांधकाम, श्रीमान तात्यासाहेब भुजबळ सभागृह व अर्ध पुतळा अनावरण.
सन १९९७ श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कुल, इमारतीचा विस्तार. श्री विनायक राजगुरू प्रयोगशाळेचे बांधकाम
सन २००० वसंत व्हिला सभागृह इमारतीचे बांधकाम
सन २००० कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इमारत बांधकाम. श्री हरी सहस्त्रबुद्धे संगणक कक्ष
सन २००० जलतरण तलाव पूर्ण करून कार्यान्वित केला
सन २००५ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इमारतीचा विस्तार-१ श्री विनायक राजगुरू ग्रंथालय.
सन २००८-०९ श्रीमती एस आर केदारी बालकमंदिर इमारतीचा विस्तार
सन २०१२-१३ पूर्व प्राथमिक विभागाच्या इमारतीचे बांधकाम
सन २०१२-१३ विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीचे बांधकाम, विद्यार्थी व विद्यार्थिनी भोजन कक्ष.
सन २०१२-१३ कृषि विज्ञान केंद्र , शेतकरी निवास, भोजनगृह इमारत बांधकाम, सुक्ष्म जीवाणू खते, सेंद्रीय औषधे निर्माण प्रयोगशाळा.
सन २०१२-१३ कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम
सन २०१४-१५ पशुधन व्यवस्थापन व दुग्ध उत्पादन पदविका करिता इमारत बांधकाम, संगणक कक्ष व प्रयोगशाळा
सन २०१६-१७
गुरुवर्य रा. प. सबनीस विद्या मंदिर नवीन इमारत बांधकाम, गुरुवर्य रा. प. सबनीस पुर्णाकृती पुतळा अनावरण.
सन २०१६-१७ पूर्व प्राथमिक विभागाच्या इमारतीचा विस्तार करण्यात आला. श्री उमाजी दगडू तांबे अॅसेंट स्कूल व श्रीमती सखुबाई उमाजी तांबे बालनिकेतन असे नामकरण करण्यात आले
सन २०१७-१८ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय इमारतीचा विस्तार-२ (उत्तर व दक्षिण विंग)
सन २०१८-१९ कृषी विज्ञान केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचा विस्तार. माती पाणी खत व पानांचे परीक्षण प्रयोगशाळा, फळप्रक्रिया प्रशिक्षण प्रयोगशाळा, शेतकरी प्रशिक्षण सभागृह बांधकाम.
सन २०१९-२० श्रीमती एस आर केदारी बालक मंदिर नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात केली आहे.
वसुंधरा फार्मचे संस्थेने गेल्या पंधरा वर्षापासून टप्प्याटप्प्याने जमिनीचे सपाटीकरण, सिंचन व्यवस्थापन, विविध पिकांची लागवड करून संपूर्ण जमीन पिकाखाली आणली. पिकांच्या स्वरक्षणासाठी सर्व क्षेत्राला अँगल, काटेरी तार व चैन लिंकचे कंपाऊंड केलेले आहे. या सर्व प्रक्षेत्रावर फळपिके, फुले, भाजीपाला, विविक्षित क्षेत्रावर संरक्षित आवरण (नेट हाऊस) करून पिके घेतली जातात. त्याचा परिसरातील शेतकऱ्यांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणासाठी उपयोग होत आहे. तसेच पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन, कुकुटपालन, गांडूळ खत उत्पादन, मधू मक्षिका, पालन व रेशीम उत्पादन या विविध व्यवसायाचे शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. स्वयंचलित हवामान केंद्राची स्थापना केली आहे, तेथे जमा होणारी हवामानाची माहिती संकलित करून त्यामुळे पिकांवरील पडणाऱ्या रोग व किडीचा अंदाज मोबाईल द्वारे शेतकऱ्यांना देण्यात येतो.
पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या विभागांची वाढ व विकास
आपल्या संस्थेचा दृष्टिकोन हा नेहमी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून अत्यल्प फी मध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा राहिलेला आहे. गुरुवर्य सबनीस यांनी ठरवून दिलेल्या नीतीपूर्ण वाटेवर संस्था चालत आलेली आहे. सेवाभावी युतीने शिक्षक ज्ञानदान करीत असतात. त्याचा परिणाम म्हणून पालक वर्गात विश्वास वाढीस लागून सर्वच विभागांमधील प्रवेशसंख्या वाढत आलेली आहे.
इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य वर्गाच्या तुकड्या, माहिती तंत्रज्ञान विषयाच्या तुकड्या इत्यादींना पालक व विद्यार्थ्यांकडून खूप मागणी असते. कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सुरू केलेल्या इंग्रजी माध्यमाच्या वाणिज्य तुकड्यांमध्येसुद्धा विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी मागणी आहे
संस्थेतील शिक्षण विभागाची केवळ संख्यात्मक वाढ न होता गुणात्मक वाढही झालेली आहे. त्याचे प्रतिबिंब प्रत्येक विभागाच्या वार्षिक निकालामध्ये दिसून येते. इयत्ता १० वी चे विद्या मंदिराचे निकाल हे नेहमी ९५ टक्के पेक्षा अधिक तर अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मिडियम स्कूल चे निकाल हे गेली काही वर्षे १००% लागत आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण व उच्च निकालाची परंपरा यामुळे यामुळे संकुलातील सर्व १७ विभागातील मिळून एकूण विद्यार्थी संख्या आजमितीस सुमारे १२००० व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संख्या ५०० पर्यंत पोहोचली आहे.
गेल्या २५ वर्षात आपली संस्था ही सातत्याने गतिमान राहिलेली असून कालानुरूप नवीन विभाग व सुविधा निर्माण करीत आली आहे. आगामी ५ वर्षांमध्ये मुलांच्या राहण्याची उत्तम सोय असलेले एक वसतिगृह, ज्युनिअर कॉलेजची गरज लक्षात घेऊन त्यासाठी त्यासाठी एक नवीन इमारत व आय.टी.आय. साठी विस्तारित इमारत बांधण्याचे नियोजन आहे.
ग्रामोन्नती मंडळ या आपल्या शैक्षणिक संस्थेचे अमृतमहोत्सवी वर्षांमध्ये यशस्वीपणे पर्दापण होण्यामध्ये समाजातील उदार देणगीदार, हितचिंतक, सामाजिक व राजकीय नेते, आमदार, खासदार, ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेतील नेते शासकीय कार्यालयातील अधिकारी व सेवक वर्ग, निस्पृह पदाधिकारी व संचालक, सर्व विभाग प्रमुख व त्यांचे सहकारी, सेवक वर्ग तसेच इत्यादी सर्वांचे मोलाचे योगदान आहे याची जाणीव संस्था पदाधिकारी, कार्यकारी संचालक व सदस्य निरंतर ठेवतील याची ग्वाही देतो.
ग्रामोन्नती मंडळाच्या सुरुवातीच्या २५ वर्षाच्या वाटचालीत कै. गुरुवर्य नानांच्या समवेत काम करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी संस्थेच्या प्रगतीला दिशा देत असताना निस्पृह निस्वार्थी त्याग, विचारांची मार्गदर्शक दिशा व समाज विकासासाठी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे. पुढील २५ वर्षाच्या कालखंडात कार्यान्वित असणारे संस्थेचे पदाधिकारी, कार्यकारिणीचे संचालक व सदस्य यांनी त्यांचा वारसा अत्यंत तन्मयतेने विचारपूर्वक जोपासून परिसरात ज्ञानाची गंगा अखंडपणे वाहती ठेवून समाजाची आर्थिक उन्नती होण्यासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी दिलेले योगदान संस्थेच्या सुवर्ण महोत्सवात अधोरेखित झालेले आहे.
अमृत महोत्सवाकडे संस्थेची वाटचाल होत असताना पदाधिकारी, कार्यकारिणी संचालक व सदस्य यांनी आपल्या पूर्वाश्रमीनी दिलेली प्रेरणा व योगदान याच मळलेल्या वाटेने संस्थेचे मार्गाक्रमण सुरु ठेवले आहे
|| तव स्मरण सतत स्फुरणदायी आम्हा घडो ||