ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे)
माझा शेतकरी प्रगत व स्वयंपूर्ण बनावा, त्याला शेतावर जाऊन मार्गदर्शन करावे, खेडयांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे असे प्रतिपादन १९४४ मध्ये आमच्या ग्रामोन्नती संस्थापक गुरुवर्य रा. प. सबनीस यांनी केले होते. शेतीला व्यवसायाचा दर्जा दिला तरच शेतीत सुधारणा होतील. शेतकऱ्यांच्या मुलांनी केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसाय उदा. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय, रेशीम उद्योग, शेळीपालन इत्यादीची जोड दिली तरच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल. विशेष म्हणजे या सर्वांचे प्रात्यक्षिक त्यांनी १९४४ ते १९६० या काळात केले.
कृषिपूरक व्यवसायांचे शिक्षण घेऊन आजचा विद्यार्थी उद्याचा उद्योजक घडेल. इतर शेतकऱ्यांनाही मार्गदर्शन करेल. परिणामी शेतीची व्याप्ती वाढेल. शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यासाठी उपाययोजना केली पाहिजे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. गुरुवर्य नानांची ही मनोमन इच्छा होती म्हणून त्यांनी तत्कालीन प्रगत असलेले युरोपियन तंत्रज्ञान या ठिकाणच्या शेतीशाळेसाठी उपयोगात आणले. हाच वारसा टिकविण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे सदस्य, संचालक मंडळ कार्यतत्पर होते. नानांचे विद्यार्थी असलेले व ग्रामोन्नती मंडळाचे विद्यमान कार्याध्यक्ष कृषिरत्न माननीय अनिलतात्या मेहेर यांच्या मनामध्ये कृषि विज्ञान केंद्राची संकल्पना अनेक दिवसांपासून होती. शेतकऱ्यांना मार्गदर्शन आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती त्यांच्या शेतावर जाऊन देणे यासाठी आपणाकडे कृषि विज्ञान केंद्र असावे, अशी प्रबळ इच्छा त्यांची होती. त्याचप्रमाणे उत्तर पुणे जिल्ह्यातील शेतीस पथदर्शी प्रकल्प राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्राची आवश्यकता समजून ग्रामोन्नती मंडळाने तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री माननीय ना. श्री. शरदचंद्रजी पवार यांच्याकडे प्रतिपादन केली. याप्रकरणी अनिलतात्यांनी स्वतः मा. पवारसाहेबांना पटवून दिले की, भारत सरकारच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतीसाठी के. व्ही.के. च्या मदतीने कसे पोचविता येईल. परिणामी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावण्यास मदत होईल. ग्रामोन्नती मंडळाच्या या प्रयत्नांची दखल घेऊन भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांनी २०१० मध्ये कृषि विज्ञान केंद्र नारायणगावसाठी मंजूर केले. ही बाब केवळ उत्तर पुणे जिल्ह्यासाठीच नव्हे तर ग्रामोन्नती मंडळ, जुन्नर- आंबेगाव, अहमदनगरच्या पश्चिम पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी गौरवास्पद बाब आहे.
आज के.व्ही.के. फक्त ९ वर्षाचे असून नानांची स्वप्नातील कृषि संकुलाची संकल्पना आता पुढे साकारताना दिसत असून केंद्राची किर्ती आज दूरवर पसरलेली आहे. के.व्ही.के. ची इमारत २०१३ मध्ये उभी राहिली मात्र २०११ च्या मार्च महिन्यापासून पहिल्यांदा तात्यासाहेब भुजबळ कृषि संकुलामधून के.व्ही.के. चे कामकाज चालत असे. इमारत उभी राहण्यास काही काळ लागला तरी शेती संशोधनाची शोध यात्रा २०१० पासूनच प्रारंभ झाली होती.
कृषि विज्ञान केंद्राची उभारणी
ग्रामोन्नती मंडळाच्या आर्थिक पाठबळामुळे केंद्र सरकारच्या सर्व नियम व अटींना बांधील राहून भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सन २०१३ के.व्ही.के.च्या प्रशासकीय इमारतीची उभारणी पूर्ण झाली. या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन विधानसभा अध्यक्ष मा. ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या विशेष उपस्थितीत झाले. मागील नऊ वर्षांमध्ये केव्हीकेच्या संशोधनीय व विस्तार कार्य उंच भरारी घेत आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण भारतामध्ये ७२१ के.व्ही.के. कार्यरत आहेत. केंद्र शासनाच्या नियमानुसार भारतातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आणि काही निवडक कृषी जिल्ह्यांमध्ये एक अतिरिक्त के.व्ही.के. असे के.व्ही.के. संपूर्ण देशात प्रस्थापित केले आहे. नारायणगावचे के.व्ही.के. हे देखील त्यापैकी एक कृषि विज्ञान केंद्र आहे. हे केंद्र कृषि क्षेत्रातील उच्चतम, नवनवीन आणि सर्वोत्तम असे कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर पोहोचविण्यासाठीची संस्था आहे. नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने ठरवून दिलेल्या रूपरेषेनुसार के.व्ही.के.चे कार्य चालते. याकरिता शाश्वत जमीन वापर पद्धतीमध्ये स्थलनिहाय योग्य तंत्रज्ञान ओळखण्यासाठी स्वीकार्य चाचणी कार्यक्रम राबविणे, विविध पिकांची आद्यरेषा प्रात्यक्षिके आयोजित करून उत्पादनाची माहिती व प्रत्याभरण (प्रतिक्रिया) संकलित करणे, प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे कृषि संशोधनामधील उद्योन्मुख तंत्रज्ञानाबद्दल विस्तारकांच्या ज्ञान व कौशल्यमध्ये वाढ करणे, ग्रामीण युवक व शेतकऱ्यांसाठी ‘प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण’ या तत्वावर आधारित उत्पादन वाढीसाठी व रोजगार निर्मितीसाठी कृषी व संलग्न विष यांवर लघु व दीर्घ मुदतीचे व्यवसायाभिमुख प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करणे. यानुसार केंद्र उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर या तालुक्यांमध्ये कृषी विस्ताराचे कार्य करत आहे.
नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून देशातील विविध संशोधन संस्था, कृषि विद्यापीठे यांच्याकडून संशोधित झालेले तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतात कमीत कमी कालावधीत पोहोचविणे, जमिनीच्या कार्यक्षम वापरासाठी विभागनिहाय विशिष्ट प्रणाली निश्चित करून पिकांचे नवीन वाण, तंत्रज्ञानाच्या चाचण्या, स्वयंरोजगार निर्मिती विषयावर तरुणांना प्रशिक्षणे, कृषि विस्तार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे, शेती आणि शेतीशी संबंधित क्षेत्रातील उत्पादन आणि उत्पादकतेत वाढ करण्यासाठी विविध पीक प्रात्यक्षिके आयोजित करून शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दाखविणे, शेतकरी सहलींचे आयोजन करणे, कृषि प्रदर्शन, कृषि मिळावे, पीक परिसंवादांच्या आयोजनातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे काम केंद्रामार्फत करत आहोत.
कृषि विज्ञान केंद्राचे उपक्रम:-
देशभर भारत सरकारच्या माध्यमातून नानाविध कृषि विस्ताराचे कार्यक्रम पार पाडले जात असतात. त्यांच्या सूचनेनुसार केंद्रामार्फत विविध प्रशिक्षणे, शेती दिन, शास्त्रज्ञ भेटी, समूह चर्चा, किसान गोष्टी, शेतकरी अभ्यास दौरा, कृषि तंत्रज्ञान सप्ताह, महत्वपूर्ण दिवसांचे उत्सव, शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शन आदी कार्यक्रम दरवर्षी राबवले जातात. परिणामी प्रतिवर्ष ९० हजार ते १ लाख शेतकरी केंद्राशी अप्रत्यक्ष जोडले गेले व संकल्प ते सिद्धी, स्वच्छ भारत अभियान, राष्ट्रीय महिला किसान दिवस, जमीन आरोग्य पत्रिका अभियान, ग्राम स्वराज अभियान, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी यासारखे उपक्रम राबवून शेतकरी मेळावे, कृषि प्रदर्शने, स्वच्छता अभियान, अन्न सुरक्षा अभियान, पारंपारिक ऊर्जा स्तोत्रांचे जतन इत्यादी केंद्र पुरस्कृत कार्यक्रमांतून ५० हजारांहून अधिक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.
1.आद्यरेषा प्रात्यक्षिके(OFT)
कृषि विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांच्या शेतावर नवीन तंत्रज्ञानावर आधारित विविध आद्यरेषा प्रात्यक्षिकांचे आयोजन गेल्या आठ वर्षापासून करण्यात येत आहे. सदरील ५५० प्रात्यक्षिके ही एकूण २१६४ शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नवीन जातींचा अवलंब खत व्यवस्थापन, पीक संरक्षण, यांत्रिकीकरण या गोष्टींचा समावेश होता. याचा चांगला परिणाम थेट शेतकऱ्यांना त्यांच्या मिळालेल्या नवतंत्रज्ञानातून दिसून आला. परिणामी आधुनिक तंत्रज्ञानाची पायाभरणी त्यांच्यापासून झाली.
2. स्वीकार्य चाचणी
केंद्रामार्फत सन २०११ ते २०१९ पर्यंत ११६ शेतकऱ्यांना स्वीकार्य चाचणी ११६३ शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानची प्रात्यक्षिके घेण्यात आली.
प्रामुख्याने वरील चाचण्यांमध्ये नवीन वाणांचा समावेश असून त्याची आपल्या भागांमधील उत्पन्न व उत्पादकता विषयाचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने फुलशेतीत निशिगंधा या पिकाची महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संशोधित केलेली फुले रजनी, शेवगा पिकाची KDM-01 अर्थात भाग्या, डाळिंबाची सुपर भगवा, जनावरांच्या खाद्याकरिता फुले जयवंत, शाश्वत उत्पादन वाढीकरिता बटाटा आणि टोमॅटो मध्ये एकात्मिक खत व्यवस्थापनावर आधारित उत्पादन तंत्रज्ञान, महिलांचे शारीरिक कष्ट कमी करण्याकरता स्पायरल सेपरेटरच्या माध्यमातून धान्याची सफाई, भाजीपाला पिकातील मूल्यवर्धित तसेच मुरघास आधी तंत्रज्ञानाचा अवलंब व त्याचा प्रसार करण्यात आला. केंद्र पुरस्कृत समूह गटांद्वारे प्रात्यक्षिकांतर्गत खरिपामध्ये सोयाबीन या पिकाचे MACS- 1188 पानाची २५० शेतकऱ्यांना १०० हेक्टर क्षेत्रावर तसेच उन्हाळी हंगामात भुईमूग पिकाच्या TPG-41, TG-37A या जातीची १५० शेतकऱ्यांना ६० हेक्टर क्षेत्रावर आणि रब्बी हंगामात हरभरा पिकाची दिग्विजय जातीची ३०० शेतकर्यांना १५० हेक्टर क्षेत्रावर प्रात्यक्षिके देण्यात आली. या प्रात्यक्षिकांचा परिणाम म्हणजे पारंपारिक पद्धतीने घेतल्या गेलेल्या पिक पद्धतीपेक्षा शास्त्रीय पद्धतीने घेतलेले प्रात्यक्षिकांचे उत्पन्न दीड पटीने वाढ पहावयास मिळाली. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांच्या आर्थिक नफ्यात वाढ झाली आणि तेलपाड अभियानाचे उद्देश देखील साध्य करण्यात हे केंद्र यशस्वी ठरले.
3. प्रशिक्षण
केंद्रांमार्फत शेतकरी, शेतकरी महिला, युवक व कृषी विस्तार कार्यकर्ते त्यांच्या ज्ञानात भर घाल णे, त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षकांकडून कार्यकुशल करणे असे अनेक उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांच्या मागणीनुसार गावामध्ये जाऊन प्रशिक्षणे दिली जातात. आत्तापर्यंत ७६५ प्रशिक्षणातून २७८२७ शेतकरी प्रशिक्षित केले आहे.
4. शेती दिन व शिवार फेरी
शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन योग्यतम तंत्रज्ञान आणि त्याचे परिणाम दाखविण्यासाठी शिवारफेरी आणि शेती दिनाचे आयोजन केले जाते. मागील ९ वर्षांमध्ये विविध पिकांवर ७५ हुन अधिक शेती दिन व शिवार फेरीचे आयोजन करण्यात यशस्वी झाले. त्या माध्यमातून ३५०० शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला.
5. शेतकरी मेळावे, किसान गोष्टी आणि चर्चासत्र कार्यक्रम
केंद्राच्या वतीने उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी आणि शिरूर या तालुक्यांमध्ये फळे व भाजीपाला, नगदी पिके, शेती आणि शेतीशी निगडित असलेले व्यवसायांवर आधारित आतापर्यंत ६१ किसान मेळावे आयोजित केले गेले. त्याच्या माध्यमातून ३३५४० शेतकरी सहभागी झाले.
6. प्रचार व प्रसार विभाग :-
शेतकऱ्यांना विविध विषयांचे मार्गदर्शन, माहिती मिळावी यासाठी वेळोवेळी विविध विषयांवर तज्ञांमार्फत विविध समाज माध्यमे, प्रसार माध्यमे याद्वारे माहिती प्रसारित करण्यात येते. यामध्ये विविध विषयांवर आधारित घडीपत्रके, माहिती पुस्तिका, माहिती पत्रिका, भित्तीपत्रिका इत्यादी प्रसारित करण्यात येतात. तसेच विविध वृत्तपत्रांतून शेतीशी निगडित लेख प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना विनामूल्य किसान मोबाइल संदेश दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने हवामान, कीड व रोग व्यवस्थापन, बाजारभावाबद्दल माहिती देण्यात येते. यामध्ये दरवर्षी साधारण २५००० हून अधिक शेतकरी या सेवेचा लाभ घेत आहे. तसेच केंद्राचा सोशल मीडिया देखील चांगल्या पद्धतीने कार्यरत असून केंद्राचे स्वतःचे फेसबुक पेज, व्हॉट्सॲप ग्रुप, ट्विटर हॅंडल आहेत. याच्या माध्यमातून ५० हजाराहून अधिक शेतकरी थेट केंद्रांशी जोडले आहेत.
7. ग्लोबल फार्मर्स भव्य कृषी तंत्रज्ञान महोत्सव:-
गेल्या ६ वर्षापासून केंद्रामार्फत जानेवारी महिन्यात कृषि तंत्रज्ञान महोत्सवाचे आयोजन केले जाते. या प्रदर्शनात प्रामुख्याने पीक प्रात्यक्षिके, पीक परिसंवाद व कृषि प्रदर्शन या ३ विभागांमध्ये विभागलेले आहे. हे कृषि प्रदर्शन दर वर्षी ८० एकर भव्य प्रक्षेत्रावर भरविले जाते कृषि आणि कृषि आधारित २०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे दालने ५० हून अधिक पिकांच्या वेगवेगळ्या जातीसह पीक- प्रात्यक्षिके उभारण्यात येतात तसेच प्रदर्शनांमध्ये डेअरी विभागाचे वेगळे दालन उभारण्यात येते. दरवर्षी या चार दिवसांच्या कृषी प्रदर्शनाला महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून सुमारे ७० हजारांहून अधिक शेतकरी भेट देतात तसेच केव्हीकेच्या प्रायोगिक प्रक्षेत्रावर शास्त्रज्ञांनी उभारलेले नवनवीन प्रात्यक्षिके आत्मसात करून शेतकरी स्वतःच्या शेतावर याचा अवलंब करतात. या प्रदर्शनाला समाजातील सर्व घटक मोठ्या उत्साहाने भेटी देतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ, व्याख्याते व कृषी उद्योजक व प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन या पीक परिसंवादाच्या माध्यमातून शेतकरी वर्गाला लाभत आहे.
8. शेतकऱ्यांकरिता उपलब्ध सोयी सुविधा:-
कृषि विज्ञान केंद्राचा मूळ उद्देश हा आहे की, शेतकऱ्यांना योग्य माहिती देणे, त्यांना प्रशिक्षित करणे, त्यांचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना सोयी-सुविधा पुरविणे यासाठी केंद्रातील विविध विभागांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. यामध्ये माती-पाणी परीक्षण, पीक चिकित्सालय, जैविक खतांचा पुरवठा, भाजीपाला व फळ रोपवाटिका, भाडेतत्वावर यांत्रिकीकरण, गांडूळ खत पुरवठा, सोया पनीर, युरिया ब्रिकेटचा पुरवठा, सुक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा, सोयाबीन बियाणे, कांदा बियाणे, चारा पिके बियाणे, डाळ मिलद्वारे तयार केलेली डाळ इत्यादी सुविधा केंद्रांमार्फत शेतकऱ्यांसाठी कमी किमतीत पुरविल्या जातात. गेल्या वर्षामध्ये केंद्रामार्फत माती ४६७५ आणि पाणी २१८ नमुने तपासणी करून १४६७९ शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका वितरण करण्यात आले
9. केंद्रांमध्ये शेतकरी/ महिला/ युवक-युवती करिता सुरू असलेले प्रकल्प/उपक्रम:-
1. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान व राष्ट्रीय गळीत धान्य व तेलपाड अभियान
2. अद्यावत माती-पाणी परीक्षण प्रयोगशाळा
3.जैविक खते व औषधांचा पुरवठा (ट्रायकोडर्मा, पी .एस .बी के. एम. बी. अझोटोबॅक्टर, सुडोमोनास)
4. युरिया ब्रिकेटस खत पुरवठा
5. भरडधान्य प्रकल्पाअंतर्गत धान्य साफ सफाई, डाळ मिल
6. सोयाबीन आधारित सोया पनीर (तोफु) प्रकल्प
7. संरक्षित शेती अंतर्गत शेडनेट हाऊसेस
8. वसुंधरा हायटेक नर्सरी (फळे, फुले व भाजीपाला रोपवाटिका)
9. शेततळ्यामध्ये गोड्या पाण्यातील मत्स्य शेती
10. मुक्त गोठा, परसबागेतील कोंबडी पालन, रेशीम उद्योग, शेळीपालन
11. गांडूळ खत प्रकल्प, नाडेप, कंपोस्टिंग
12. फळ प्रक्रिया प्रकल्प
13. अग्री क्लिनिक व ऍग्री बिझनेस अभ्यासक्रम, मॅनेज हैदराबाद
14. कृषी निविष्ठा विक्रेत्यांकरिता कृषि पदविका अभ्यासक्रम, मॅनेज हैदराबाद
15. किमान कौशल्यावर आधारित उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम, भारत सरकार
16. जिल्हा परिषद पुणे यांच्या नाविन्यपूर्ण योजनेतून शेतकऱ्यांना कीड व रोगाचे निदान योजना (क्रॉप ॲम्बुलन्स)
17. युवक व युवतींसाठी रोजगाराभिमुख प्रकल्प आर्या
10. प्रशासकीय इमारतीचे विस्तारीकरण:-
केंद्राने स न २०१८-१९ मध्ये छोट्या स्वरूपातील माती पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे विस्तारीकरण करून नव्या स्वरूपात राष्ट्रीय शेती अभियानांतर्गत अद्यावत स्थायी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेची उभारणी केली. या प्रयोगशाळेत माती, पाणी, पानदेठ व खतांची अचूक तपासणी करण्यात येते. या प्रयोगशाळेत मातीतील १६ घटकांची पाण्यातील ६ घटकांची आणि पानदेठ परीक्षण अन्नद्रव्यांची अचूक तपासणी केली जाते. तसेच माती, पाणी, पानदेठ व खते यात उपलब्ध असलेले नायट्रोजनचे प्रमाण, जस्त, लोह, तांबे, मॅंगनीज आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचे अचूक प्रमाण काढणे शक्य झाले आहे. प्रयोगशाळेतील अद्यावत यंत्रणेद्वारे शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य मिळाल्यामुळे आधुनिक पद्धतीने शेतीपिकांचे संगोपन करणे या प्रयोगशाळेद्वारे शक्य झाले आहे.
भाजीपाला फळ प्रक्रिया विभाग:-
शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या फळे व भाजीपाला या मालाची प्रतवारी करून त्यावर आधुनिक पद्धतीने प्रक्रिया करून त्यांच्या उत्पादित मालावर प्रक्रिया करून चांगला भाव मिळून त्यांचे आर्थिक स्थैर्य सुधारेल यादृष्टीने शेतकरी, महिला शेतकरी तसेच युवक व युवती यांना प्रक्रिया प्रशिक्षण मिळावे याकरिता अद्यावत अशी फळे व भाजीपाला प्रक्रिया प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली.
शेतकरी सभागृह :-
दिवसेंदिवस शेतकऱ्यांची प्रशिक्षणाची वाढती गरज लक्षात घेऊन संस्थेने २५० शेतकरी बसतील एवढ्या क्षमतेचा अद्यावत शेतकरी सभागृह सुरू केले.
वसुंधरा प्रायोगिक प्रक्षेत्र:-
ग्रामोन्नती मंडळाकडे असलेले विविध विभागांच्या आवश्यकतेनुसार संस्थेकडे ८० एकरावर प्रस्थापित असे बागायती सर्व फळा-फुलांनी बहरलेले वसुंधरा प्रायोगिक प्रक्षेत्र आहे. मागील १० वर्षांपूर्वी हेच प्रक्षेत्र खाच-खळगे, चढ-उतारांचे माळरान होते. परंतु संस्थेच्या कार्यकारिणीची दूरदृष्टी आणि शेतकऱ्यांची गरज ओळखता आज ८० एकरावर नंदनवन फुलविण्यात संस्थेला यश आले आहे. क्षेत्रफळ मोठे असल्याकारणाने सुरुवातीला फळबागा, हळूहळू फुलशेती, भाजीपाला, खरिपातील पिके, चारा पिके, शेडनेट पॉलिहाऊस, गुंटूर पद्धतीने फळबागा लागवडी अशा पद्धतीने या माळरान फुलविण्यात केंद्रातील अधिकाऱ्यांना यश आले. सुरुवातीच्या काळात पाण्याचा प्रश्न सोडविण्याकरिता संस्थेने दोन कोटी लिटरची दोन मोठी शेततळी उभारली. त्याच्या माध्यमातून ऑटो इरिगेशन प्रणालीद्वारे संपूर्ण प्रक्षेत्राला ओलिताखाली आणले. तसेच प्रक्षेत्रावर परिसरातील वन्यजीव, खापर तसेच इतर अनैसर्गिक कारणांमुळे मोठी हानी व्हायची याकरिता संपूर्ण प्रक्षेत्राला सुमारे ३ किलोमीटर एवढे तारेचे कुंपण करून सर्व सीमा बंद केल्या. त्यामुळेच आज वसुंधरा फार्म नावारूपास आले.
शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज आणि पिकांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी प्रक्षेत्रावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना दररोजचे तापमान, वाऱ्याचा वेग, दिशा, आद्रता, पाऊस जमिनीचे तापमान, बाष्पीभवन इत्यादी घटकांची माहिती उपलब्ध झाली.
सदरील प्रक्षेत्रावर जानेवारी महिन्यामध्ये कृषि तंत्रज्ञान महोत्सवाच्या माध्यमातून ग्लोबल फार्मस प्रात्यक्षिकांवर आधारित कृषि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान ८० एकरावरील प्रक्षेत्रावर विविध फळे- फुले, भाजीपाला दुग्धव्यवसाय, आदिंचे प्रात्यक्षिके प्लॉट शेतकऱ्यांना खुले करण्यात येते. व वसुंधरा फार्मवरील हे प्रदर्शन पाहण्यासाठी राज्यातून लाखो शेतकरी भेटी देतात तसेच वर्षभर देशातील अनेक राज्यातून शेतकरी कृषि प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आवर्जून येत असतात.
पुरस्काराने सन्मानित :-
सन २०१४ साली ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष माननीय अनिलतात्या मेहेर यांना महाराष्ट्र शासनाने कृषिरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सन २०१५ साली महाराष्ट्रातील कृषी विस्तार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल द मेडिया रुट्स व मेडिया विंग्स या संस्थेने कृषि विस्तार शिक्षण कार्याबद्दल कृषि विज्ञान केंद्रास कृषि सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले
कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल तात्या मेहेर यांना महाराष्ट्र १ या वृत्तवाहिनीने कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुणे आयडॉल २०१७ या पुरस्काराने सन्मानित केले.
केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांना सन २०१८ साली कृषि क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने शिवनेरी भूषण या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सन २०१९ मध्ये न्यूज १८-लोकमत मिडिया मार्फत केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिलतात्या मेहेर यांना कृषि विस्तारातील उल्लेखनीय कार्याबद्दल कृषि सन्मान बळीराजाचा या पुरस्काराने गौरविण्यात आले.
केंद्र सरकारच्या निती आयोगामार्फत भारतातील कृषि विज्ञान केंद्रांना दिलेल्या मानांकनानुसार ग्रामोन्नती मंडळ कृषि विज्ञान केंद्रास अ ग्रेड मिळाला आहे.
कृषि विज्ञान केंद्राचे कृषि क्षेत्रातील काम नेहमीच उल्लेखनीय राहिलेले आहे. ग्रामोन्नती मंडळाचे कार्याध्यक्ष, कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न श्री. अनिलतात्या मेहेर यांच्या खंबीर नेतृत्वाखाली आम्ही वाटचाल करत असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्याचबरोबर ग्रामोन्नती मंडळातील सर्व संचालक शेतकऱ्यांच्या प्रती काम करण्यास आम्हांला नेहमीच प्रोत्साहित करत असून त्यांचे प्रश्न सोडविण्याकरिता नेहमीच प्रयत्नशील राहतात. आमची कार्यक्षमता आणि मनोबल वाढविण्यासाठी ग्रामोन्नती मंडळातील सर्व संचालक, सदस्य आणि शेतकरी बांधव नेहमीच आम्हा सर्वांना प्रोत्साहन देत आहेत.
श्री. राहुल घाडगे श्री प्रशांत शेटे
कृषी विस्तार विषयतज्ञ वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे) कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव (पुणे)