शैक्षणिक विकासासमवेतच व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य नानासाहेब तथा राजाराम परशुराम सबनीस यांनी १९५० च्या दशकात केले होते. ग्रामोन्नती मंडळाची स्थापना कृषी, व्यवसायिक व पारंपारिक शिक्षण प्रसारासाठी झाली आहे. मुलोद्योगी शिक्षण तथा सर्वकष शिक्षण प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाने "आण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र (इथून पुढे आय.टी.आय. असा उल्लेख) या तंत्रशाखेची स्थापना केली. कोणत्याही कामासाठी कुशलता ही महत्त्वाची आहे. दर्जेदार व विपुल उत्पादनासाठी उद्योगांमध्ये कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. कुशल कामगार तयार करणे ही देशाची फार मोठी सेवाच आहे. या सद्हेतूने नारायणगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची सुविधा ग्रामोन्नती मंडळाने आयटीआय या शाखेमार्फत उपलब्ध करून दिली आहे.
आण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र : वाटचाल
लेखक : श्री. व्ही.पी. माळी, प्राचार्य (Click here)
शैक्षणिक विकासासमवेतच व्यावसायिक शिक्षणही आवश्यक आहे, असे प्रतिपादन गुरुवर्य नानासाहेब तथा राजाराम परशुराम सबनीस यांनी १९५० च्या दशकात केले होते. ग्रामोन्नती मंडळाची स्थापना कृषी, व्यवसायिक व पारंपारिक शिक्षण प्रसारासाठी झाली आहे. मुलोद्योगी शिक्षण तथा सर्वकष शिक्षण प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामोन्नती मंडळाने "आण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र (इथून पुढे आय.टी.आय. असा उल्लेख) या तंत्रशाखेची स्थापना केली. कोणत्याही कामासाठी कुशलता ही महत्त्वाची आहे. दर्जेदार व विपुल उत्पादनासाठी उद्योगांमध्ये कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. कुशल कामगार तयार करणे ही देशाची फार मोठी सेवाच आहे. या सद्हेतूने नारायणगाव सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाची सुविधा ग्रामोन्नती मंडळाने आयटीआय या शाखेमार्फत उपलब्ध करून दिली आहे.
सन 1978-79 या शैक्षणिक वर्षांमध्ये ग्रामोन्नती मंडळ आणि रोटरी क्लब, जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मंडळाचे सभासद व ज्येष्ठ रोटेरियन श्री शशिकाका ठुसे यांच्या पुढाकाराने दि. 3 ऑक्टोबर 1978 रोजी श्री.ठुसे यांच्या वर्कशॉपमध्ये रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. म.ना. डांगे यांच्या उपस्थितीत "तांत्रिक शिक्षण केंद्राचे" औपचारिक उद्घाटन झाले.
प्रारंभी टर्नर, फिटर, वेल्डर, वायरमन आणि प्लंबर इत्यादी विद्याशाखांची प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होती. विशेष म्हणजे सुटीच्या कालावधीसाठीही इयत्ता आठवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनाही व्होकेशनल प्रशिक्षणासाठी प्रवेश देण्यात आला. रोटरी क्लब, नारायणगाव या संस्थेकडून दि. 7 ऑक्टोबर 1979 रोजी "तांत्रिक शिक्षण केंद्र" ग्रामोन्नती मंडळाकडे वर्ग करण्यात आले. ग्रामोन्नती मंडळाच्यावतीने तत्कालीन अध्यक्ष श्री अनंतराव कुलकर्णी आणि कार्याध्यक्ष श्री भा.बा.बनकर, त्याचप्रमाणे शिक्षण मंत्री मा. सदानंद वर्दे यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. त्यावेळी ग्रामोन्नती मंडळाची रौप्यमहोत्सवी वाटचाल चालू होती. संस्थेचा नावलौकिक पाहून मा. वर्देसाहेब म्हणाले, गुरुवर्यांनी ही संस्था काढली, जोपासली, वाढविली, मोठी केली. त्यांच्या पश्चात ती आणखी मोठी करणे, ग्रामीण भागात ती आदर्शप्रत नेणे ही देखील तितकीच महत्त्वाची बाब आहे.
तांत्रिक शिक्षण केंद्र चालवणे ही मोठी खर्चिक बाब होय. मंडळाने आर्थिक सहाय्यासाठी केलेल्या आवाहनास प्रतिसाद म्हणून रोटरी क्लब, मुंबई (मेन) यांनी रु. 15000 आर्थिक मदत केली. प्रारंभी विद्यमान श्रम-शिक्षण केंद्र या सभागृहाजवळील एका खोलीमध्ये आय.टी.आय.चे काम चालत असे.
आपण चांगल्या कामाचा प्रारंभ केला की, समाजही त्यात मोठा हातभार लावत असतो. गुरुवर्यांनी प्रारंभ केलेल्या या शैक्षणिक यज्ञामध्ये त्यांनी अनेक माणसे जोडली. काहीजण कार्य पाहून आकर्षित झाले. काहीजण समविचारांनी जवळ आले. असेच समविचारी असलेले गणेश गोविंद तथा अण्णासाहेब नवरे यांनी नवरे विश्वस्त निधी व गोविंदानंद सेवा ट्रस्ट या दोन विश्वस्त संस्थांमार्फत रु.५०००० एवढी भरीव देणगी या दोन्ही ट्रस्टचे विश्वस्त रामचंद्र गणेश नवले, रामचंद्र भिकाजी निरगुडकर आणि आणि सुभाष रामचंद्र नवरे यांनी आय.टी.आय. साठी दिली. त्यांच्या या मदतीचा धागा आगामी काळात घट्ट राहावा या हेतूने व ग्रामोन्नती मंडळाने नवरे परिवाराची स्मृति जपावी यासाठी आय.टी.आय.चे नामकरण "श्री अण्णासाहेब नवरे तांत्रिक शिक्षण केंद्र" असे दिनांक 7 मार्च 1981 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन सांस्कृतिक कार्यमंत्री मा जयंतराव टिळक यांच्या हस्ते करण्यात आले.
सुरुवातीची वाटचाल :
आय टी आय च्या तिसऱ्या वर्षापासून शासनमान्य ट्रेडसाठी प्रवेश संख्या वाढली. व्यवस्थापक श्री शशिकांत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना विविध औद्योगिक ठिकाणांना भेटी, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी चा दृष्टिकोन, विविध मान्यवरांच्या भेटी इत्यादी प्रकल्प राबविण्यात आले. उन्नती मंडळाचे माजी अध्यक्ष आणि तत्कालीन जुन्नर पंचायत समितीचे अध्यक्ष मा. शिवाजीराव खैरे यांनी जुन्नर पंचायत समिती मार्फत ग्रामोन्नती मंडळ तांत्रिक शिक्षण केंद्राच्या इमारतीसाठी रु. एक लाख 42 हजार 580 इतकी मदत केली. त्यामधून तांत्रिक प्रशिक्षण केंद्राच्या वर्गखोल्यांचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. परिसरातील उद्योजकांनीही ही आता आय टी आय ला भेट देण्यास सुरुवात केली. सिताराम रंगूजी शिंदे हे त्यापैकी एक होय. 1984 च्या जूनपासून फिटर या ट्रेडसाठी महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाची मान्यता मिळाली. शासकीय मान्यतेनुसार 16 विद्यार्थ्यांना फिटर साठी प्रवेश दिला. आयटीआयच्या व्यवस्थापनाची जबाबदारी श्री. ल. गो. करंदीकर आणि प्राचार्य म्हणून श्री. जे. व्ही. कुलकर्णी यांनी स्वीकारली. 1987 च्या जुलै-ऑगस्ट मध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र म्हणून औंध आय.टी.आय. केंद्र मिळाले. या परीक्षेमध्ये हे विद्यार्थ्यांनी भरघोस यश मिळविले. एकूण निकाल 98 टक्के एवढा लागल्याने महाविद्यालयातील वातावरणामध्ये चैतन्य पसरले.
वास्तुविस्तार :
प्रारंभी एका वर्कशॉपमध्ये ज्याचे रोपटे लावले "तयाचा वेलू गेला गगनावरी" असा प्रत्यय येऊ लागला. शिक्षण शाखांचा विस्तार, वाढती विद्यार्थी संख्या, नव्याने विद्या शाखांना सरकारी मान्यता मिळणे इत्यादी बाबींमुळे विद्यार्थ्यांना त्यावेळेची इमारत कमी पडू लागली. अद्ययावत वर्कशॉपची आवश्यकता भासू लागली. वर्कशॉपसाठी पुन्हा मा. नवरे परिवाराने रु. 45000, सौ विजया ठुसे यांनी दोन खिडक्या, मा. सिताराम रंगुजी शिंदे यांनी रु. 10000, नारायण हरि सहस्त्रबुद्धे यांनी रु. 50000 या मौलिक देणग्यांमधून विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वर्कशॉप इमारत उभी राहिली. ग्रामोन्नती मंडळाने आणखी एक पाऊल पुढे टाकून तत्कालीन तांत्रिक शिक्षण केंद्राचे चेअरमन श्री रवींद्र पारगावकर व इतर पदाधिकारी यांनी वर्कशॉपसाठी नवीन लेथ मशीन व इतर आवश्यक साधनसामग्री साठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला.
औद्योगिक क्षेत्रासाठी 1999 - 2000 हे वर्ष मंदीचे वर्ष होते. परिणामी विद्यार्थी संख्या काही प्रमाणात घटली. मात्र निकालाचे प्रमाण वाढले. शैक्षणिक वर्ष 2000-01 पासून विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका योजना राबविण्यास प्रारंभ झाला. याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण विभागातर्फे आपल्या आय.टी.आय.चे निरीक्षण करण्यात येऊन "अ" दर्जा प्राप्त झाला. दि. 17 ऑगस्ट 2000 रोजी आयटीआयचे सुपरवायझर...... सेवानिवृत्त झाले.
आय. टी. आय. साठी गौरवाची बाब म्हणजे 2003 च्या ऑगस्ट महिन्यापासून गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग अँड फॅशन डिझाइनिंग व ॲडव्हान्स कॅड-कॅमसह सी. एन. सी. टेक्नॉलॉजी या दोन नवीन अभ्यासक्रमांना मान्यता मिळाली. त्याचप्रमाणे 2005 पासून दहावी पास विद्यार्थ्यांसाठी डिझेल मेकॅनिक हा नवीन कोर्स सुरू करण्यात आला. विशेष म्हणजे वरील दोन्ही नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रमांचा निकाल 100% लागला. 2010 या वर्षापासून पुणे शहरांमधील निओविजन प्रा. लि. आणि के.सी. टूल्स प्रा. लि. पुणे या कंपन्यांमार्फत आय.टी.आय. मध्ये कँपस मुलाखती आयोजित करण्यात आल्या. पहिल्याच वर्षी आपल्या तीन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. आता कंपन्यांचे येणे-जाणे, संपर्क वाढला. दिनांक 14 जानेवारी 2011 रोजी कॉस्मो इंटरनॅशनल प्रा. लि. चाकण आणि कॅनडास्थित ग्लोबल डायरेक्टर ऑफ अप्रेंटीस ट्रेनिंग या दोन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आय.टी.आय. ला भेट दिली. ग्रामीण भाग असूनही ग्रामोन्नती मंडळाने विद्यार्थ्यांना ज्या सोयी-सुविधा पुरविल्या आहेत त्याचे त्यांनी कौतुक केले.
डिझेल कारागीर या कोर्ससाठी आलेल्या विद्यार्थ्यांना जॉब ट्रेनिंग ही संकल्पना पटवून दिली. परिणामी परिसरातील भागेश्वर गॅरेज, ओम साई गॅरेज, माऊली ट्रॅक्टर गॅरेज व न्यू इंडिया गॅरेज या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांना बौद्धिक प्रगतीसाठी अभ्यासेतर उपक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात येते. पुणे विद्यापीठाच्या बहिःशाल व्याख्यानमाला, बॅरिस्टर जयकर व्याख्यानमाला आणि तज्ज्ञ व्याख्यात्यांची व्याख्याने आयोजित केली जातात. स्कील इंडिया अंतर्गत आपण कुशल कामगार निर्मिती करून राष्ट्राची सेवा निरंतर पुढे चालू ठेवू.
कमवा व शिका :
तांत्रिक शिक्षण केंद्रांमध्ये विद्यार्थी विविध प्रकारच्या जीवनोपयोगी वस्तू तयार करत असतात. नारायणगावचे ग्रामदैवत मुक्ताई देवीच्या यात्रेमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या. त्या ठिकाणच्या सर्व वस्तूंची विक्री होऊन आगामी काही ऑर्डर देखील मिळाल्या. एक-दोन दिवसांमध्ये विद्यार्थ्यांनी रु. 1200 इतके उत्पन्न मिळवले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या "कमवा आणि शिका" या शिकवणीप्रमाणे वाटचाल चालू आहे.
एक विशेष गोष्ट अशी आहे की ग्रामोन्नती मंडळाच्या विविध वर्गांसाठी ज्या नूतन वास्तूंची निर्मिती होते त्या सर्व इमारतीचे दरवाजे, खिडक्या आणि इतर सर्व लोखंडी काम आय.टी.आय. च्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून केली जातात. या प्रात्यक्षिक कामामधून विद्यार्थ्यांचा सराव होतो. कमवा व शिका योजनेमार्फत त्यांना मानधनही प्राप्त होते.
माजी विद्यार्थी :
माजी विद्यार्थ्यांनी घेतलेली गरुड झेप पुढील विद्यार्थ्यांना स्फूर्तीदायी ठरते. माजी विद्यार्थी शिरीष जठार यांनी टर्नरचा कोर्स पूर्ण केला व ते आता ट्रॅक्टरच्या शोरूमचे मालक झाले आहेत. राजेंद्र डोके हा लेथ मशीन ऑपरेटर कोर्सचा माजी विद्यार्थी, त्याने आता स्वतःचे विघ्नहर फॅब्रिकेशन हे युनिट सुरू केले आहे. त्यामधून इतरांनाही त्याने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. फिटर कोर्सचा माजी विद्यार्थी रमेश खेबडे हा विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे रुजू झाला आहे. संतोष माठे, योगेश रायकर, बंडू ढोबळे, राजू पाटील, निलेश पासलकर, दीपक कुलकर्णी, समीर कोल्हे हे सर्व आमचे माजी विद्यार्थी आता उद्योजक म्हणून परिसरामध्ये नावारूपास आले आहेत.
टर्नर वर्कशॉप
प्लॅॅस्टिक मुक्ती अभियान
आय टी आय प्राचार्य नामावली
1979-81 श्री. जे. व्ही. कुलकर्णी
1981-91 श्री. ल. गो. करंदीकर
1991- श्री. व्ही. पी. माळी
श्री. व्ही. पी. माळी, प्राचार्य (Since १९९१)