श्री. अनंतराव विठ्ठल जाधव यांनी आपली मावशी
श्रीमती सिताबाई रामचंद्र केदारी यांच्या स्मरणार्थ
दि. 14/9/1991 रोजी मोठी देणगी दिली.
तेव्हा पासून शाळेचे नाव
श्रीमती सिताबाई रामचंद्र केदारी बालक मंदिर
असे करण्यात आले आहे.
ठळक वैशिष्ट्ये : Salient Features:
कार्यरत शिक्षक- १ मुख्याध्यापक, २२ शिक्षक, १ लेखनिक , ६ सेविका, १ शिपाई
प्रशिक्षित शिक्षक वर्ग
प्रशस्त इमारत व खेळाचे मैदान
सुविधा : जनरेटर, RO पिण्याचे पाणी, संगणक लॅॅब, प्रोजेक्टर, स्विमीग पूल
संगीत क्लास
कार्यानुभव शिक्षण
सांस्कृतिक कार्यक्रम
शैक्षणिक सहली
वार्षिक स्नेहसंमेलन
स्पर्धा परीक्षा
सेमी इंग्लिश वर्ग
School website https://sites.google.com/view/balakmandir/home
शाळेचा परिचय :
सन १९७९ मध्ये बालवाडी विभागाची सुरुवात झाली होती. शाळेचे पहिले नाव 'शिशुनिकेतन' असे होते. 13 जून 1984 रोजी पहिल्या इयत्तेचा वर्ग सुरु करण्यात आला आणि शिशुनिकेतन हे नाव बदलून "बालक मंदिर" असे करण्यात आले. त्यावेळी शाळेत 66 विद्यार्थी शिक्षण घेत होते.
श्री. अनंतराव विठ्ठल जाधव यांनी आपली मावशी श्रीमती सिताबाई रामचंद्र केदारी यांच्या स्मरणार्थ दि 14/9/1991 रोजी 1,25,000 देणगी दिली. तेव्हा पासून शाळेचे नाव श्रीमती सिताबाई रामचंद्र केदारी बालक मंदिर असे करण्यात आले आहे..
सन 1985-86 मध्ये इयत्ता दुसरीचा एक वर्ग तसेच 1986-87 मध्ये इयत्ता दुसरी ते इयत्ता चौथीच्या प्रत्येकी एक तुकडी व इयत्ता पहिलीच्या दोन तुकड्या सुरु करण्यात आल्या. यावेळी एकुण विद्यार्थी संख्या 238 होती.
26 नोव्हेंबर 1987 रोजी प्राथमिक विभागास शासन मान्यता मिळाली.
सुरुवातीच्या 66 या विद्यार्थीसंख्ये वरून शाळेने प्रगतीपथावर वाटचाल करत शैक्षणिक वर्ष 2020- 21 मध्ये विद्यार्थी संख्या 877 वर पोहोचली असून प्रत्येक इयत्तेचे पाच पाच वर्ग आहेत.
सर्व भौतिक सुविधा असलेली सुसज्ज व प्रशस्त इमारत ग्रामोन्नती मंडळाने उपलब्ध करून दिली आहे. सर्व वर्गखोल्या प्रशस्त, भरपूर सूर्यप्रकाश असलेल्या व हवेशीर आहेत. खेळाचे मैदान, जनरेटरची सुविधा, RO पिण्याचे पाणी संयंत्र, संगणक प्रयोगशाळा, प्रोजेक्टर इत्यादी उल्लेखनीय बाबी.
उच्चशिक्षित व अनुभवी शिक्षिका वर्ग. कार्यरत शिक्षक : १ मुख्याध्यापक ,२२ शिक्षक, १ lलेखनिक, ६ सेविका, १ शिपाई
शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने सर्व प्रकारचे शिक्षण दिले जाते. त्यामध्ये संगीत, नृत्य, समूहगीते, हस्तकला मातीकाम, शेती संबंधी माहिती व विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन केले जाते. तसेच भारतातील थोर नेत्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी करण्यासाठी बालक विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या बाल-सभांचे आयोजन केले जाते. धार्मिक सण-उत्सव, राष्ट्रीय सण यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना कार्यक्रमाद्वारे व प्रत्यक्ष अनुभवातून दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी, विविध गुणदर्शन, फॅन्सी ड्रेस, वक्तृत्व, कथाकथन, श्लोक पाठांतर या स्पर्धाबरोबर सहशालेय स्पर्धांचे आयोजन केले जाते.
विद्यार्थ्यांचा आहार कसा असावा याविषयी पालकांना मार्गदर्शन केले जाते.
दरवर्षी शाळा व्यवस्थापन समिती व पालक शिक्षक संघातर्फे विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी व रक्तगट तपासणी केली जाते.
विद्यार्थ्यांचे सुदृढ व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी शाळेत व ग्रामोन्नती मंडळामार्फत विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते.
दरवर्षी शाळेत सहली व क्षेत्रभेटीचे आयोजन करून 'एक दिवस निसर्गाच्या सान्निध्यात' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सानिध्याचा अनुभव दिला जातो.
शाळेतील आनंददायी वातावरण, ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन व प्रोत्साहन, अनुभवी शिक्षक वर्ग, सुज्ञ पालक वर्ग इत्यादी सर्व घटकांमुळे शाळा प्रगतीपथावर वाटचाल करत आहे.
मुख्याध्यापक नामावली :
ग्रामोन्नती मंडळाच्या स्थापनेनंतर गुरुवर्य रा प सबनीस (नाना) यांची सर्वकष व सर्वव्यापी शिक्षणाची संकल्पना वास्तव्यात आणि विस्तार या दोन्ही बाबी करण्यासाठी केवळ माध्यमिक शिक्षणावर अवलंबून राहणे योग्य नव्हते. त्यासाठीचा प्रारंभ हा लहान वयात पोटापासून होणे अभिप्रेत होते. नारायणगाव परिसरामध्ये प्राथमिक शिक्षणाची इतरत्र सोय असली तरी ग्रामोन्नती मंडळानेही प्राथमिक शिक्षण विभागाची सुरुवात करावी असा अनेक पालकांचा आग्रह होता. परिणामी शैक्षणिक वर्ष 1984 ते 1985 मध्ये इयत्ता पहिलीचा वर्ग सुरू केला. तत्पूर्वी ग्रामोन्नती मंडळाच्या संचालिका मा. नंदाताई डांगे यांच्या कल्पनेतून 'शिशूनिकेतन' सुरु झाले होते. 1984 मध्ये त्याचे नामकरण 'बालकविद्यामंदिर' असे करण्यात आले. पहिल्या वर्षाचे विद्यार्थी संख्या 66 एवढी होती. तत्कालीन बालक विद्यामंदिराच्या समितीमध्ये मा. सौ. नंदाताई डांगे, विमलताई ठकार, हेमलता सोहनी त्याचप्रमाणे मा. श्री. कृ. चि. मेहेर व श्री. व्ही. व्ही. कुलकर्णी यांचा समावेश होता. अध्यापनाची सुरुवात सौ. एम. ए. कानिटकर, र. श. घोडेकर यांनी केली. वर्षभरातील दैनदिन अभ्यासेतर उपक्रमांमध्ये विविधगुणदर्शनाची सुरुवातही याचवर्षी झाली. वारूळवाडी गावचे तत्कालीन सरपंच मा. अनिलतात्या मेहेर यांचे हस्ते बक्षीस वितरण झाले. हा बालक विद्या मंदिराचा योगायोग आहे की, या वर्षीची शैक्षणिक सुरुवात नारायणगावचे तत्कालीन सरपंच मा. भिमराव खैरे यांचे हस्ते सुरुवात तर बक्षीस वितरण वारूळवाडीचे सरपंच मा. अनिलतात्या यांचे हस्ते.
पुढील शैक्षणिक वर्षांमध्ये विद्यार्थी संख्या 120 एवढी झाली. आगामी काळात विद्यार्थी संख्येचा आलेख वाढत गेला. दिनांक 26 नोव्हेंबर 1987 रोजी 1ते 4 या वर्गासाठी प्राथमिक विभागात शिक्षण उपसंचालक, पुणे यांनी मान्यता दिली. 1988 मध्ये बालक मंदिराची पहिली बॅच इयत्ता चौथी पास होऊन बाहेर पडली. अभ्यासक्रमा शिवाय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ही विद्यार्थ्यांचा सहभाग वाढला. उदा. सागर रामसिंग कोल्हे हा विद्यार्थी 1988 मध्ये इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये आला. क्षितीज पवार, पूनम माळवदकर, राजेश बाप्ते या या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'शास्त्रीय नरसाळे' या शास्त्रीय उपकरणास तालुका व जिल्हा पातळीवर क्रमांक मिळाले.
विद्यार्थी संख्या वाढू लागली परिणामी मोठ्या प्रशस्त इमारतीची आवश्यकता भासू लागली. ग्रामोन्नती मंडळाच्या दूरदृष्टीमधून दि. 26 जानेवारी 1986 रोजी मंदिराच्या इमारतीचे भूमिपूजन मुंबईस्थित प्रसिद्ध उद्योजक व जुन्नर तालुक्यातील उंब्रज गावचे श्री शंकररावजी यशवंत हांडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांनी ग्रामोन्नती मंडळास 25000/- रुपयांची देणगी दिली. दि. 26 जानेवारी ते 1 सप्टेंबर 1986 या कालावधीत बालकमंदिराची इमारत पूर्ण झाली. 1993 पासून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी 'छंदवर्ग' हा नव्याने प्रयोग करण्यात आला. यावर्षी अमोल रामसिंग कोल्हे हा विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत सर्वप्रथम आला. हाच विद्यार्थी म्हणजेच आज नाट्य क्षेत्रांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे डॉ. अमोल कोल्हे होय. तुषार अनिल दोषी हा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादी मध्ये आला. सुंदर हस्ताक्षर स्पर्धामध्ये भाग घेतलेल्या सर्वच मुलांनी क्रमांक पटकाविले. शाळेतील शिक्षिका ही मागे नव्हत्या. सौ. अनघा साने व सौ. दिपाली वाणी या दोघींना अभिनय स्पर्धेमध्ये पारितोषिक मिळाले.
इ. स. 1992-93 यावर्षी विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी पुणे आकाशवाणी केंद्राच्या संचालिका उष:प्रभा पागे यांना बोलाविण्यात आले. ग्रामोन्नती मंडळासाठी योगदान देणाऱ्या श्रीमती सीताबाई रामचंद्र केदारी यांच्या स्मरणार्थ बालक मंदिराचे नामकरण ' श्रीमती सीताबाई रामचंद्र केदारी बालक मंदिर असे करण्यात आले'. शिष्यवृत्तीच्या क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल सौ. मि. अ. कानेटकर यांना ' स्कॉलरशिप मार्गदर्शक शिक्षिका' हा जिल्हास्तरीय पुरस्कार मिळाला. नारायणगाव हा ग्रामीण भागात इंग्रजी भाषेचे माध्यम इंग्रजी शाळांमध्ये असले तरी व्हावा तेवढा इंग्रजीचा प्रसार अजून होणे बाकी होते. महाराष्ट्र सरकारने पहिलीपासून इंग्रजी चा आग्रह 2006 पासून धरला. या ठिकाणी एक बाब विशेषत्वाने नमूद करणे आवश्यक आहे की, ग्रामोन्नती मंडळाने इयत्ता पहिली पासून ते इंग्रजीचा आग्रह नव्हे तर वापर 1995-96 यावर्षीपासून सुरू केला होता. मंडळाच्या संचालिका मा. नंदाताई डांगे यांनी इंग्रजीचा विशेष आग्रह धरून त्यासाठी श्रीमती रत्ना गोविंद शेटे यांची विशेष इंग्रजी शिक्षिका म्हणून नियुक्ती केली. एका बाजू शैक्षणिक प्रगती चालू असतानाच सौ. सुरेखा ब्रह्मे, यांनी विद्यार्थ्यांची क्रीडांगणावरील तयारी उत्तम पद्धतीने केली. आज ही लहान मुलांची कवायत पाण्यासारखी आहे. विद्यार्थ्यांना पोहणे शिकवण्यासाठी स्वतंत्र जलतरण तलावाची निर्मिती करून शैक्षणिक संकुलातील प्रत्येकास पोहता आले पाहिजे यासाठी क्रीडा विभागातील श्री. अजय भुतडा आणि मा. डॉ. डांगे यांचा आग्रह विशेष वाखाणण्यासारखा आहे. केवळ शैक्षणिक नव्हे तर मार्शल आर्ट, जलतरण स्पर्धा, धावणे इत्यादीमध्ये आनंद पोटे, मधुजा पारगावकर. आकाश कोबल, प्रणव भालेराव या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली.
1999 मध्ये शाळेस पुणे जिल्हा परिसरातील 'उत्कृष्ट' शाळा असा पुरस्कार मिळाला. प्राथमिक विभागाचे तत्कालीन चेअरमन डॉ. आनंद कुलकर्णी यांच्या संकल्पनेमधून विद्यार्थ्यांनी 'कारगील निधी' गोळा करून शहीदांच्या परिवारांना मदत केली. याचवर्षी 'पालक-शिक्षक' संघाची स्थापना झाली. शाळेच्या उपक्रमांची माहिती पुणे जिल्हा परिषदेच्या सी.ई.ओ. राधा यांच्या कानावर पडताच त्याने शाळेस भेट दिली. शिक्षणामध्ये आधुनिक साधनांचा वापर आता अनिवार्य झाला आहे. ग्रामोन्नती मंडळाने 2002 पासून आपले संपूर्ण कामकाज सर्वच शाखांचे संगणकीकृत केले. त्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास संगणक प्रशिक्षण वर्गास पाठविले. नाट्य व अभिनय क्षेत्रामध्ये शाळेचे घेतली. सौ अलका सुर्वे (शिक्षिका) उत्तम अभिनयासाठी मिताली नवले या विद्यार्थिनीस तालुकास्तराचे प्रथम पारितोषिक मिळाले.
2007 या शैक्षणिक वर्षांमध्ये आमच्या शाळेचा माजी विद्यार्थी व सिनेनाट्य क्षेत्रातील अग्रणी अभिनेता डॉ. अमोल कोल्हे यांना पारितोषिक वितरण कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये आपण आपले व्यक्तिमत्व कसे घडविण्यास वाव आहे याविषयी त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आता शिष्यवृत्तीच्या क्षेत्रात चांगली प्रगती केली. 2009मध्ये 51, 2010 मध्ये 12, 2011, 2012 व 2013 पर्यंत भाग घेतलेल्या 100% विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. 2012 यावर्षापासून शाळेचा गणवेश स्वीकारण्यात आला.
2013 पासून प्राथमिक विभागाचे चेअरमन म्हणून मा. श्री अरविंदभाऊ मेहेर यांनी सूत्रे हाती घेतली. यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ईशांत खानापुरकर व 2014-15 मध्ये ओम नितीन पोखरकर यांनी क्रमांक मिळविले.
बालक मंदिराच्या या शैक्षणिक वाटचालीमध्ये सर्व शिक्षिका सौ. सुनिता पारखे, अर्चना करांडे, सौ. नलिनी कानडे, सौ. आशा भुजबळ, अनघा साने, अरुणा साबळे, रूपाली सोनवणे, जिजाबाई भांगे, त्याच प्रमाणे माजी मुख्याध्यापिका सौ. र. श. घोडेकर 1988-89 पासून काम करणाऱ्या सौ रेखा ब्रम्हे आणि सौ. सु. श. ठिपसे त्याचप्रमाणे आतापर्यंत शाळेमधून निवृत्त झालेल्या शिक्षिका, शिक्षकेत्तर कामाची प्रशासकीय धुरा सांभाळणाऱ्या सौ. अवसरीकर या सर्वांचे योगदान आणि ग्रामोन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची दूरदृष्टी या सर्वांच्या बळावर शाळेने आपले स्थान टिकविले आहे. शाळेची विद्यार्थी संख्या स्थापनेपासून आजपर्यंत सातत्याने वाढतच आहे.