श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल : कालक्रम
‘एकोपा’ या संस्थेने सेंट अँथनी स्कूल ही इंग्रजी माध्यमाची शाळा नारायणगावमध्ये सुरू केली होती. इयत्ता के.जी. वर्ग ते इयत्ता नववी पर्यंतची विद्यार्थी संख्या २०० एवढी होती.
१९८३
एकोपा संस्थेने व्यवस्थापन आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्यामुळे सदर शाळा ग्रामोन्नती मंडळाकडे हस्तांतरित करण्याची पावले उचलली. शाळा हस्तांतराची कायदेशीर प्रक्रिया जानेवारी १९८३ मध्ये पूर्ण झाली.
फेब्रुवारी १९८३
शाळेचे स्थलांतर गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराच्या वास्तूमध्ये केले.
जून १९८३
शाळेमध्ये आवश्यकते प्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करून अध्यापनास सुरुवात केली.
१९८४
के.जी. ते इयत्ता दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सोय नूतन वास्तूमध्ये करण्यात आली.
जून १९८५
शाळेची पहिली दहावीची बॅच बाहेर पडली
१९९६
शाळेचे नामकरण ‘श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल’ असे करण्यात आले.
श्री अनंतराव कुलकर्णी हे नानांचे विश्वासू सहकारी, पुणे येथील ‘कॉण्टिनेंटल प्रकाशन’ या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेचे जनक, शिक्षण विश्वाची मोठी जाण, शिक्षणातील अद्ययावत प्रवाहांची ओळख असणारे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्व होय. त्यांचे ग्रामोन्नती मंडळास अर्थपूर्ण योगदान आहे.
१९९८
श्री अनंतराव कुलकर्णी, विश्वस्त, यांचे देहावसान झाले.
१९९७
श्री विनायक राजगुरू प्रयोगशाळा वास्तु तयार झाली.
मुख्याध्यापक नामावली:
१९८३ श्री. वा. शी. वाटवे
१९९३ श्री. डी. के. कुलकर्णी
१९९४ श्री. एस. व्ही. मुळे
२००० सौ. जे. के. जोरी
२००३ श्री. आय. एस. पठाण
२००७- सौ. ए. एस. जोशी
सौ. ए. एस. जोशी
२००७-
वार्षिक अंक : रेनबो
अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल
आपणास मातृभाषेचे समवेत राष्ट्रभाषा आणि किमान जागतिक भाषांपैकी एक तरी भाषा अवगत असणे आवश्यक आहेत. 'इंग्रजी' भाषा आज जागतिक पातळीवर सर्वत्र वापरली जाते. आपण तिच्या वापरापासून अलिप्त राहू शकत नाही. ज्येष्ठ मराठी साहित्यिक विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी 'इंग्रजी भाषा ही वाघिणीचे दूध आहे', असे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये प्रतिपादन केले आहे. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाची शाळा असावी या गरजेमधून नारायणगावमधील 'एकोपा' संस्था 'सेंट अँथनी स्कूल' इंग्रजी माध्यमाची ग्रामीण भागात शाळा चालू होती. ही शाळा नारायणगाव मधील आजच्या डॉ. विद्वांस यांच्या हॉस्पिटल जवळ होती. संस्थेची परिस्थिती शाळा चालवण्यात सक्षम नसल्यामुळे संबंधित शाळा व्यवस्थापनाने ग्रामोन्नती मंडळास इंग्रजी माध्यमाची शाळा चालविण्याची विनंती केली. प्रामुख्याने मराठी कर्मचाऱ्यांची पाले होती. इयत्ता केजी वर्ग ते इयत्ता नववी पर्यंतची विद्यार्थी संख्या 200 एवढी होती. अरविंद केंद्राचे प्रमुख श्री. सरपोतदार यांनी ग्रामोन्नती मंडळाकडे इंग्रजी माध्यमाची शाळा वर्ण करण्यात मोठे योगदान दिले. ग्रामोन्नती मंडळाच्या व्यवस्थापनाने इंग्रजी शाळेच्या भवितव्याचा सर्वकष विचार करून शाळा सत्तांतराची कायदेशीर प्रक्रिया 19830 च्या जानेवारी महिन्यामध्ये पूर्ण केली. ग्रामोन्नती मंडळाने आता इंग्रजी शिक्षणाच्या दृष्टीने प्रथम पाऊल टाकले. त्यासाठीचा सर्व पत्रव्यवहार पूर्ण करण्यासाठी मंडळास काही आर्थिक बाबींची झळ सोसावी लागली. 'सेंट अँथनी स्कूल' मधील अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचे 1982 च्या पासूनचे वेतनाची 20000/- (वीस हजार रुपये) एवढी रक्कम ग्रामोन्नती मंडळाने अदा केली एवढेच नव्हे तर, पूर्वीच्या शाळेतील सर्व शिक्षकांनी मंडळाच्या सेवेत सामावून घेतले.
गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिरामधील शिक्षकांनी इंग्रजी शाळेचा अध्यापनाची मदत केली. 1983 च्या जूनपासून शाळेमध्ये आवश्यकतेप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतरांची ची नेमणूक केली.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थलांतर
नारायणगावमधील सेंट अँथनी स्कूलची जागा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसल्याने 1983 च्या फेब्रुवारी महिन्यापासून तिचे स्थलांतर गुरुवर्य रा. प. सबनीस विद्यामंदिराचे वास्तूमध्ये केले. प्रारंभीच्या काळात मंदिराचे मुख्याध्यापक सु. कृ. गोसावी यांनीच इंग्रजी शाळेचा अतिरिक्त कारभार सांभाळला आणि इंग्रजी शाळेचे कामकाज नियमित सुरू झाले.
जुन्नर, नारायणगाव व मंचर परिसरांमधून विद्यार्थी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेऊ लागले. आता शाळेसाठी स्वतंत्र वास्तू असावी अशी गरज भासली. ग्रामोन्नती मंडळाने इंग्रजी शाळेसाठी 16 खोल्यांची स्वतंत्र इमारत उभारण्याचा निर्णय घेतला. तात्पुरती गरज भागविण्यासाठी 05 वर्गखोल्या तयार झाल्या. इंग्रजी शाळेच्या कामकाजासाठी 'शाळा समिती' ची नियुक्ती केली.
1. श्री. अ. दत्त चिंतामणी
2. श्री. म. ना. डांगे
3. श्री. कृ. चि. मेहेर
4. श्री. भा. बा. बनकर
5. श्री. बा. गे. पाटे
6. श्री. वि. वि. कुलकर्णी
1984 पासून केजी ते दहावी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांची सोय नूतन वास्तू मध्ये करण्यात आली. इंग्रजी शाळा विनाअनुदानित तत्वावर चालविण्यास मान्यता मिळाली असल्याने संस्थेचा मोठा आर्थिक भार उचलावा लागणार होता. त्याकामी'विदेश संचार निगम' (V.S.N.L.) या संस्थेची ग्रामोन्नती मंडळास अर्थपूर्ण मदत झाली. प्रारंभी ते ग्रामोन्नती मंडळास प्रतिवर्षी 25000/- (पंचवीस हजार रुपये) अनुदान देत असत. हळूहळू कालानुक्रमे ही रक्कम 225000/- (दोन लाख पंचवीस हजार रुपये) एवढी वाढविली. शाळेची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास हातभार लागला.
10 जून 1985 शाळेची पहिली दहावीची बॅच बाहेर पडली. यावर्षीचा निकालाने सर्वांना आश्चर्यचकित केले. कारण निकाल 80% एवढा लागला होता. त्यावेळी शाळेचे विद्यार्थी संख्या 220 एवढी होती. 1986-87 या शैक्षणिक वर्षांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रथमत ' स्कॉलरशिप ' परीक्षेसाठी सहभाग नोंदवला. निकाल मात्र 40% एवढाच लागला. मात्र आता विद्यार्थ्यांना जाणीव होऊ लागली की, आपण आता कोठे आहोत आणि नेमके काय करावे लागेल. तत्कालीन शाळा समिती प्रमुख आणि ग्रामोन्नती मंडळाचे पदाधिकारी डॉ. हिरालाल शाळांच्या दूरदृष्टी व सामाजिक जाणिवेमधून समाजसेवेचा एक भाग म्हणून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे शिबिर ' निरगुडे' या गावी नेण्यात आली. विद्यार्थी आता सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होऊ लागले. 1988 च्या डिसेंबर महिन्यामध्ये रोटरी क्लब शिवाजीनगर यांनी आयोजित केलेल्या चित्रकला स्पर्धेत मनीषकुमार विटोलिया राम कृष्ण हरी व कुमार चेतन शहा यांनी पारितोषिके मिळविली. यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेचा निकाल 100% लागला. परिणामी विद्यार्थी विविध उपक्रमांमध्ये उस्फूर्तपणे सहभाग घेऊ लागले. सकाळ नाट्यवाचन, चित्रकला परीक्षा, विज्ञान प्रदर्शन, स्काऊट गाईड, कथाकथन इत्यादी स्पर्धांची आता ओळख झाली. यात केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकही मागे नव्हते. श्रीमती मंगला मराठे यांनी 'अखिल भारतीय साने गुरुजी कथाकथन स्पर्धा', पुणे (शिक्षकांसाठी आयोजित) स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त केला. शाळेची ओळख पुणे जिल्ह्यात झाली. आशिया खंडातील क्रमांक 2 ची दुर्बिण असलेला प्रकल्प उभारणारे मा. डॉ. गोविंद स्वरूप, माजी जिल्हा न्यायाधीश थॉमस गे यांनी शाळेस भेटी दिल्या.
विद्यार्थ्यांच्या साहित्यिक कल्पनेस वाव मिळावा या हेतूने शाळेचा रेनबो हा वार्षिकांक विद्यार्थ्यांच्या साहित्यकृतींनी तयार झाला. पुढे तो प्रतीवर्षी नित्यनेमाने काढला जात आहे. ही वाटचाल चालू असताना तत्कालीन मुख्याध्यापक श्री. वा. शि. वाटवे यांनी सेवा नियमाप्रमाणे निवृत्ती घेतली. १९८३ ते १९९३ या कालावधीत श्री. वाटवे यांच्या अथक प्रयत्नांमुळेच शाळा नावारूपास आली. असाच वारसा चालविण्याची जबाबदारी पेलण्यासाठी विहित नियमाप्रक्रियाप्रमाणे मुख्याध्यापकपदी डी. के. कुलकर्णी यांची निवड केली. मात्र याचवर्षी शाळा व मंडळासाठी घटणारे व्यक्तिमत्व पोपटशेठ मुथ्था हे निधन पावले. इंग्रजी माध्यमाची शाळा ग्रामीण भागात असली तरी शाळेतील वातावरण व संभाषण इंग्रजीमय असण्यावर श्री. कुलकर्णी यांनी भर दिला आणि शाळेने कात टाकली. १९९४ मध्ये कुणाल रत्नदीप भरविरकर हा विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत ८९.७१% गुण मिळवून प्रथम तर शाळेचा निकाल 96% एवढा लागला. याचवर्षी शाळेने ' पुणे विभागीय मंडळांमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व इंग्रजी माध्यम शाळांमध्ये सर्वप्रथम येण्याचा मान' आपल्या शाळेने मिळविला. शाळेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे दिले जाणारे कै. विश्वराज फळणीकर हे मानाचे पारितोषिक मिळाले
दि. 30 सप्टेंबर 1993, महाराष्ट्रावर भूकंपाची नैसर्गिक आपत्ती कोसळली. आभाळच फाटले तर ठिगळे तरी कोण-कोण आणि किती ठिकाणी लावायची. आमचे विद्यार्थी एकत्र आले. आपापल्या खाऊ मधून ५६९/- रुपये भूकंपग्रस्तांसाठी निधी देऊन मदतीमध्ये खारीचा वाटा उचलला. सामाजिक ऋणामधून उतराई होण्याच्या प्रयत्नांमध्ये असतानाच आमच्या शाळेचे सदस्य आणि ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष मा. कृ. चि. मेहेर (दादा) अनंतात विलीन झाले. हा मोठा मानसिक धक्का होता.
1994-95 हे गुरुवर्य नानासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष. त्यानिमित्त विविध उपक्रमांची रेलचेल झाली. पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या नाट्य स्पर्धेमध्ये शाळेचे शिक्षक शि. वा. मुळे यांनी लिहिलेल्या 'ब्याह रचाके देखो' हिंदी संगीत नाट्यछटेस प्रथम क्रमांक प्रथम क्रमांक, उत्तम दिग्दर्शन म्हणून शि. वा. मुळे यांना, तर उत्तम अभिनयाचे पारितोषिक परवेज हमीद पठाण इत्यादींना गौरविण्यात आले. आतापर्यंत शाळेचे नाव 'इंग्रजी माध्यमाची शाळा' असे होते. १९९६ या वर्षापासून ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकारी व सभासदांनी निर्णय घेतल्याप्रमाणे शाळेचे नामकरण दि. 19 डिसेंबर 1996 रोजी 'श्री अनंतराव कुलकर्णी इंग्लिश मीडियम स्कूल' असे करण्यात आले. श्री अनंतराव कुलकर्णी हे नानांचे विश्वासू सहकारी, पुणे येथील 'कॉन्टिनेन्टल प्रकाशन' या प्रतिथयश प्रकाशन संस्थेचे जनक, शिक्षण विश्वाची मोठी जाण, शिक्षणातील अद्ययावत प्रवाहांची ओळख असणारे प्रतिभा संपन्न व्यक्तिमत्त्व होय. त्यांचे ग्रामोन्नती मंडळास अर्थपूर्ण योगदान आहे.
भारतीय मानव समाज विकास केंद्र, औरंगाबाद या ठिकाणी आयोजित केलेल्या सुंदर हस्ताक्षर व चित्रकला स्पर्धेमध्ये आपल्या शाळेस 'आदर्श प्रशाला' हा गौरव तर वंदना रोहिदास बनसोडे यांना कला शिक्षिकेचा 'कलारत्न पुरस्कार' प्राप्त झाला. मुख्याध्यापकपदी असलेले श्री. एस.व्ही. मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आता शाळेची वाटचाल सुरू झाली. विद्यार्थ्यांसाठी ' श्री विनायक राजगुरू प्रयोगशाळा' उभी राहिली. परिणामी विद्यार्थ्यांमधील विज्ञानविषयक जिज्ञासा वाढू लागली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'मिन्स ऑफ कम्युनिकेशन्स' या विज्ञान उपकरणास तालुकास्तरावर प्रथम क्रमांक मिळाला. राष्ट्रीय छात्र सेना विभागामध्येही शाळेने नावलौकिक कमावला. स्नेहा पुनामिया ही विद्यार्थिनी एम.सी.सी. विभागामध्ये ' बेस्ट कॅडेट' म्हणून निवडली. मात्र १९९८ मध्ये ज्यांच्या नावाने शाळा आहे ते शाळेचे आधारस्तंभ, श्री. अनंतराव कुलकर्णी हे अनंतात विलीन झाले. ग्रामोन्नती मंडळासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची चर्चा याच ग्रंथांमध्ये अन्यत्र करण्यात आली आहे. शाळेमध्ये कार्यरत असताना मुख्याध्यापक पदी आलेले श्री. एस. व्ही. मुळे यांनी सेवेतून निवृत्ती घेतली. सौ. ज्योती जोरी यांनी एक वर्ष आणि श्री. आय. एस. पठाण या दोघांनी शाळेची धुरा २००७ पर्यंत सांभाळली. २००७-०८ पासून सौ. अनघा जोशी मुख्याध्यापकपदी आल्या. दरम्यानच्या काळात शैक्षणिक वर्ष 2012-2013 पासून शाळा समितीचे अध्यक्ष म्हणून जेष्ठ शल्यविशारद डॉ. आनंद कुलकर्णी यांनी सूत्रे हाती घेतली.
आता शाळेने मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग झेप घेताना राज्यपातळीवर नाव कमावले. हिंदी प्रवेश परीक्षेमध्ये संपूर्ण राज्यात प्रथम आलेला मयुर मधुकर दिघे हे याचे उत्तम उदाहरण होय. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील विद्यार्थ्यांचे यश, विज्ञान प्रदर्शनामधील सहभाग, पारितोषिक प्राप्ती, स्काऊट गाईड मधील यश, माजी विद्यार्थ्यांचे शाळेसाठी योगदान, (उदा. शाळेत इयत्ता १०वी मध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास माजी विद्यार्थी कुणाल भरविरकर व समीर शेख हे दोघेजण ट्रॉफी देतात.) सांस्कृतिक विभागाअंतर्गत शरद मल्हार महोत्सवातील सहभाग, इत्यादी विविध क्षेत्रांमध्ये शाळेने नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
स्काऊटच्या क्षेत्रामध्ये हरिद्वार येथे राष्ट्रीयच नव्हे तर इंग्लंड मधील लंडन येथे यशस्वी सहभाग घेतला. महाराष्ट्राचे व ग्रामोन्नती मंडळाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी सौ. अनघा जोशी व सौ. जयश्री फुलसुंदर व पाच विद्यार्थिनींना मिळाली.
अभ्यासेतर उपक्रम मध्ये नेत्रदीपक कामगिरी करताना शाळेने प्रारंभापासूनची उज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
अशा प्रकारे उत्तरोत्तर प्रगतीचे पाऊल टाकत असताना गुरुवर्य नानांनी दिशा दिलेल्या ग्रामोन्नती मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन व त्यांच्या अर्थपूर्ण योगदानामुळेच ही विकासाची यशस्वी वाटचाल चालू आहे.