ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी शिक्षण शाखांपैकी एक शाखा म्हणजे २००६ च्या जून महिन्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांचेशी संलग्न म्हणून सुरू झालेले कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय होय.
अद्ययावत डिजिटल वर्गखोल्या, सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर. सुसज्ज ग्रंथालय इत्यादी सुविधांनी युक्त महाविद्यालयाची इमारत 2013 मध्ये उभी राहिली.
विद्यार्थ्यांना कृषी प्रात्यक्षिकांसाठी वसुंधरा फार्म, स्वतंत्र कृषी संग्रहालय, अत्याधुनिक शीतगृह, कृषिविद्या विषयाच्या अभ्यास करण्यासाठी Meteorology युनिट, पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विषयाच्या प्रात्यक्षिकांसाठी डेअरी युनिट, मृदा शास्त्र, मृदा पत्रिका, कीटकशास्त्र, कृषी विपणन, व अर्थशास्त्र व्यवस्थापन या विषयाचे प्रात्यक्षिक युनिट अशा प्रकारची आवश्यक त्या सोयीसुविधांनी युक्त महाविद्यालयाची इमारत, तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन, इत्यादी अंतर्बाह्य घटकांच्या जोरावर ग्रामोन्नती मंडळाच्या या महाविद्यालयाने अल्पावधीतच नेत्रदीपक कामगिरी केली आहे.
महाविद्यालयामध्ये BBA(Agri) आणि BSc(ABM) हे आठ सेमिस्टरचे चार वर्ष कालावधीचे पदवी अभ्यासक्रम चालविले जातात. या कोर्सेसना महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद, पुणे यांची मान्यता आहे. २००३ च्या जून महिन्यापासून BSc ABM या नावाने हा पदवी कोर्स सुरू करण्यात आला.
या अभ्यासक्रमाच्या सातव्या व आठव्या सत्रांमध्ये Experiential Learning आणि Plant Training ही दोन सत्रे प्रात्यक्षिकांची आहेत. सातव्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना पुढे कोणत्या क्षेत्रामध्ये करीअर करावयाचे आहे त्याविषयीचे एक मॉड्यूल निवडायचे असते. त्या विषयाच्या एका स्वतंत्र युनिटवर काम करणे आवश्यक असते. आपल्या महाविद्यालयांमध्ये ५ मॉड्यूल ची सुविधा उपलब्ध आहे. उदा. कृषी अर्थशास्त्र या विषयांमध्ये Project Formulation of High Value Crops या मॉड्यूल अंतर्गत विद्यार्थ्यांनी हरितगृहातील फुले व भाजीपाला उत्पादन असा उपघटक निवडणे अभिप्रेत आहे. कृषीपणन या मॉड्यूलमध्ये कृषीसाठी आवश्यक साधनांविषयीची माहिती व प्रात्यक्षिके, कृषी रसायने, बी-बियाणे, खत, औषधे इत्यादीची माहिती करून घेतली जाते. कृषी व्यवसाय विभागामध्ये 'Agri-based Industries' वर जास्त भर आहे. त्यामध्ये प्रामुख्याने शेतीपूरक व्यवसायांचा समावेश आहे.
आठव्या सत्रामध्ये Agri business चे स्वरूप व त्यामधील कौशल्ये स्वतःच्या विकासासाठी कशी वापरावीत याविषयीचे 'In Plant Training' असते. प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या घरी व शेतावर जाऊन त्याविषयीचे संपूर्ण ज्ञान व नवीन तंत्रज्ञानाची ओळख शेतकऱ्यांना करून दिली जाते. गुरुवर्य नानासाहेब सबनीस या अनुषंगाने म्हणत की, 'जोपर्यंत आपण नवीन शेती तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांना बांधावर जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याची परिस्थिती सुधारणार नाही''. आमच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी हेच प्रात्यक्षिक करतात. या सर्व अभ्यासानंतर विद्यार्थ्याला पदवी प्राप्त होते. पहिली बॅच २००९-२०१० मध्ये उत्तीर्ण होऊन बाहेर पडली. त्यानंतरच्या वर्षांमध्ये प्रत्येक बॅचचा निकाल उंचावत जाऊन १००% पर्यंत पोहोचला आहे.
विद्यमान काळात कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा आवाका मोठ्या प्रमाणात वाढल्याने, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीही उपलब्ध असल्याकारणाने एकंदरच या पदवीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवली जाते त्यावेळी खुप स्पर्धा असते.
अभ्यासेतर उपक्रम : कृषी व्यवसाय शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव होण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना (NSS), शारीरिक क्षमता वाढविण्यासाठी शारीरिक शिक्षण, क्रीडा विभाग, विविध लघु अभ्यासक्रम व अभ्यासेतर चर्चासत्रे तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या सहाय्याने आयोजित केले जातात. राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांनी व खेळाडू विद्यार्थ्यांनी विद्यापीठ पातळीपर्यंत आपली निपुणता दाखविली आहे. या सर्वांची माहिती संग्रहित रहावी यासाठी महाविद्यालयातर्फे 'वसुंधरा' हा वार्षिक अंक प्रकाशित केला जातो.
कृषी व्यवसायाच्या बळकटीकरिता सक्षम मनुष्यबळाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्थापन झालेले हे महाविद्यालय सातत्यपूर्ण गुणवत्ता टिकवण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी ग्रामोन्नती मंडळाचे संचालक मंडळ हा प्रेरणेचा स्त्रोत आहे. संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्ग्ग्दर्शन आणि पाठींब्यामुळेच या महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर सेवक वर्ग आणि विद्यार्थी एव्हढी प्रगती करू शकले आहेत.
आगामी काळात MBA(Agri) हा कोर्स सुरू करण्यासाठीचे प्रयत्न चालू आहेत. त्याचप्रमाणे जागतिकीकरणाच्या या युगामध्ये परदेशी विद्यापीठाशी संलग्न होऊन विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर Exposure देणे याकडे लक्ष दिले जात आहे.